जे एन यु घृणा का?


जे एन यु गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्ध झाले आहे अर्थात काहींच्या दृष्टीने ते चांगले आहे तर काहींच्या दृष्टीने वाईट आहे. कोणत्याही ठिकाणी योग्य व अयोग्य, चांगले व वाईट हे असणे स्वाभाविक आहे कारण सापेक्षता विना आकलन होत नाही. असो सध्या जे एन यु विद्यार्थी फी वाढ करण्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत तर सरकार नेहमीप्रमाणे ते मोडीत काढण्याचा प्रयत्न ते प्रकार करीत आहे.
वर्तमान सरकारचे जे एन यु वरती खास प्रेम आहे असो तो राजकारणाचा एक भाग आहे. राजकारणा पलीकडे जे समाजकारण आहे त्यामध्ये जे घडते ते निश्चित चिंता जनक आहे. सामाजिक सांकेतिक स्थळावर ज्याप्रकारच्या प्रतिक्रिया वाचनात येतात त्याचा अभ्यास केला तर भावी समाज व भावी पिढी यांच्या संदर्भात चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे. अर्थात सगळ्या व्यक्तींचा वा समाजाचा असाच निष्कर्ष असेल किंवा असावा असा विचार करणे मूर्खपणा ते अज्ञान द्योतक आहे.
समर्थन अथवा विरोध करणारे कोणत्याही पातळीचा वा थराचा विचार न करता टीकाटिप्पणी करतात हा त्यांच्या संस्काराचा एक भाग आहे, काही काळाने त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. पण टीकाटिप्पणी करताना वास्तवाचा कितपत अभ्यास करतात हा संशोधनाचा विषय आहे व लेखनाचा, चिंतनाचा खरा आशय आहे.
वर्तमान पिढीची ज्ञानाची भिस्त म्हणजे सामाजिक सांकेतिक स्थळ आहेत. सामाजिक सांकेतिक स्थळावर जे काही प्रसिद्ध होते तेच वास्तव व सत्य असा समज बाळगणारे अनेक तरुण आहेत. याप्रकारच्या तरुणांना बौद्धिक कुपोषण हि एक व्याधी आहे. वर्तमानपिढीच्या बौद्धिक कुपोषणात भर घालणारा घटक म्हणजे मिडिया. पत्रकारिता हा आता पेशा नसून एक धंदा झाला असल्याने पत्रकार दुकानदारी चालवण्यासाठी काही करू शकतात.
पत्रकार हे पत्रकार कमी व्यापारी अधिक झाले आहेत त्यामध्ये वाढती स्पर्धा आहे त्यामध्ये स्वतःला टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रकार वारंवार घडतो आहे. पत्रकार धादांत खोटी बातमी देतात नंतर ते पितळ उघडे पडते पण कधी पत्रकार त्या संदर्भात माफी मागत नाही. थोडक्यात अपना काम बनता भाड मे जाय जनता. कसेही व काही करून मला माझी दुकानदारी नफ्यात ठेवायची आहे असा सगळा प्रकार असताना वास्तविक अभ्यास वा सत्य याची अपेक्षा करू नये. अर्थात सगळे पत्रकार धंदा करतात असे नाही पण धंदेवाईक पत्रकार अधिक आहेत.
पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ होता आजकाल आधारस्तंभ खेचणारा वर्ग झाला आहे. कोणताही पत्रकार काय सांगतो, काय विश्लेषण करतो ते सत्य मानण्याची गल्लत कधी करू नये, बाकी सगळे पत्रकार काय सांगतात वा विश्लेषण करतात हे देखील पहावे सोबत आपण आपल्या क्षमतेनुसार विचार ते अभ्यास करून निष्कर्ष घ्यावा पण वर्तमान तरुणांना बौद्धिक कुपोषणाने ग्रासले असल्याने न विचार न अभ्यास करता समोर दिसले ते सत्य मानत वाटचाल करणे हा प्रकार त्यांच्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनाला प्रभावित करीत आहे असेच याचा परिणाम भावी पिढीवर देखील होणार आहे.
समर्थन अथवा विरोध यामागे अभ्यास असावा पण री ओढणारा प्रकार अधिक जाणवतो. जे एन यु प्रथम गाजली त्यामागे एका वाहिनीने देशद्रोही घोषण दिल्याने संघर्ष असे स्वरूप दिले वास्तवात अंतर्गत निवडणुका व त्यामधील संघर्षाला वृत्तवाहिनीने मासला लावत वातावरण तापवले. नंतर तो सगळा प्रकार कोर्टात गेला व पुरावा दाखल म्हणून देण्यात आलेला सदर वाहिनीचा व्हीडीओ नकली निघाला पण तो पर्यंत जे एन यु वर अनेक तरुणांनी देश द्रोहींचा अड्डा असा शिक्का मारला व तो नवीन वादात प्रतिक्रिया देताना वापरला जातो.
जे एन यु मध्ये डाव्या विचारांना मानणारे अधिक असून त्यांचे वर्चस्व तिथे आहे. उजव्या विचार सारणी असणारे देखील आहेत पण त्यांना तिथल्या निवडणुकात यश मिळत नव्हते तो मार्ग सुकर करण्याच्या साठी सगळा खटाटोप करण्यात आला असावा. समाजात सध्या डाव्या विचारांना देशद्रोही संबोधन देण्यात येते कारण नक्षलवादी चळवळ व चीन मध्ये असणारे त्या विचारांचे सरकार. अर्थात हे प्रथम दर्शनी आहे पण त्यामागील वास्तव म्हणजे उजवे सगळे धर्म विचारी देव, धर्म, प्रथा यांचा अभिमान मानत चालणारे डावे विचार न धर्म मानतात, न भेदभाव इथे मानवता व मानवी हक्क यांना प्राधान्य.
विचारसारणी उजवी असो कि डावी अथवा अलिप्त या समस्त विचारसरणी मानव निर्मित असून ज्याप्रमाणे मानवाला मर्यादा आहेत त्याच प्रमाणे समस्त विचारसरणी यांना मर्यादा आहेत. कोणत्याही प्रकारची विचारसरणी हि फक्त विचारसरणी असते तर योग्य वा अयोग्य, चांगली वा वाईट हे व्यक्ती सापेक्ष निष्कर्ष असून व्यक्तिगत मत यापलीकडे त्यांचे महत्व नाही. कोणत्याही विचारसरणी संदर्भात समर्थन असो कि विरोध करताना यासंदर्भात भान राखणे गरजेचे आहे.
कोणत्याही विचारसरणीला अंतिम सत्य किंवा समग्र समजणे अज्ञान द्योतक असून कट्टरपणा म्हणजे बौद्धिक कुपोषण ते दिवाळखोरी याचे लक्षण आहे व यामागे कारक असतो तो अहंकार. अहंकार आला कि हुंकार आला म्हणजे द्वेष, घृणा, तिरस्कार सारखे घातक घटक आले. हे समस्त घातक घटक व्यक्तिगत व सामजिक जीवनाला हानिकारक आहेत म्हणजे अप्रत्यक्षात देशाला घातक आहेत.
जागतिक इतिहास पाहता ज्यादेशात एकाच विचारसरणीचे वर्चस्व सोबत बाकी विचारसरणी संदर्भात द्वेष होता त्या देशात अनागोंदी माजली व इतर जगाने त्याचा फायदा ते गैरफायदा घेतला आहे. पण ज्या देशात विविध विचारांना स्थान आहे त्या देशाने प्रगती केली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा देखील एक उत्तम उदाहरण आहे, यामध्ये अनेक विचारधारा असणाऱ्या व्यक्तींनी काम केले पण एखादा अपवाद वगळता परस्पर विचारंचा द्वेष केला आहे. तो अपवाद मांडला तर राजकारण होणार आहे. आपण समाजकारणाचा विचार करीत आहोत.
जे एन यु मध्ये जे घडत आहे त्याचा अलिप्त दृष्टीने अभ्यास करून वाटचाल करणे गरजेचे आहे विशेषतः तरुणांना हे काम करावे लागणार आहे. कधी कोणत्या व्यक्तीवर कोणती वेळ येईल याचा नियम व भरवसा नाही त्यामुळे आज जे सुपात आहेत त्यांनी जात्यात आहेत त्यांना हसू नये वा टवाळी करू नये. कधी काळी विद्यमान पंतप्रधान यांनी टीका केली पण सत्येत आल्यावर त्यांच्यावर टीका होत आहे.
आपण जर द्वेषाचे फुत्कार मारत राहिलो तर त्याच्यापेक्षा अनेक पटीने आपल्याला परतावा मिळणार आहे कारण निसर्ग नियम. आपण जे काही पेरतो ते किती प्रमाणात असते व जेव्हा उगवते ते किती प्रमाणात असते हे मी सांगण्याची गरज नाही. जे एन यु एक निमित्त आहे खरा मुद्दा बौद्धिक कुपोषणावर मात करणे आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

पेरावे तसे उगवते

अंथरूण पाहून पाय पसरणे