पेरावे तसे उगवते
पेरावे तसे उगवते ही एक म्हण तसेच एक निसर्ग नियम देखील आहे. कोणत्याही मानवाचे दैनंदिन आचरण पाहता मनात विचार येतो. मानवाला यासंदर्भात माहिती असून याची जाणीव नसावी अन्यथा मानवाने आचरण करताना दक्षता घेतली असती. मानवाचे दैनंदिन आचरण पहा त्यामध्ये हिंसाचार, दुसऱ्यांचा अपमान करणे, दुसऱ्यांना त्रास देणे, द्वेष, घृणा, तिरस्कार करणे यासारखे प्रकार सर्रास घडतात. अर्थात याप्रकारचे आचरण करण्यामागे अज्ञान आहे.
अज्ञानी लोकांना जाणीव होण्यासाठी एक अनुभव मांडतो आहे. हा अनुभव म्हणजे कल्पनाविलास अथवा कथा नाही तर वास्तव आहे. एकाच घरात नांदणाऱ्या दोन जावा-जावा. यादोघी समवयस्क आहेत. यापैकी ज्या मानाने मोठ्या आहेत त्यांनी फक्त अधिकाराचा वापर करीत इतर जावांकडून काम करून घेतले तसेच विभक्त होण्यासाठी आकांड-तांडव केले. स्वतःच्या सासू- सासऱ्यांची कधी देखभाल केली नाही. अगदी सासू तीन वर्ष अंथरुणात पडून होत्या तरी देखील पहिले नाही.
दोन नंबरच्या जाऊ बाईंनी मात्र सासू-सासऱ्यांची सेवा केली व स्वतःच्या समस्त कर्तव्यांची पूर्तता केली. आज या जावा-जावांना सुना तसेच जावई आहेत. थोरल्या जाऊ बाईंना त्याच्या स्वतःच्या सून बाईंची सेवा करावी लागत आहे. तसेच सुना सरळ सांगतात तुम्ही तुमच्या सासूचे केले नाही त्याप्रमाणे आम्ही तुमचे करणार नाही. थोडक्यात ज्यांनी स्वतःच्या सासूला सुनवास केला त्यांना आज सुनवास भोगावा लागत आहे. तेच दुसऱ्या जाऊ बाईंना मात्र काही काम न करता जेवणाचे तयार ताट मिळते. यांच्या सुनांन स्वतःच्या सासू बद्दल आदर आहे.
एकीने सासूला त्रास दिला त्यांना आता त्यांच्या सुना त्रास देतात तेच एकीने सासूला सांभाळले त्यांना आता सुना सांभाळत आहेत. एकीने स्वतःच्या सासूला जी काही वागणूक दिली त्याच प्रकारची वागणूक त्यांच्या सुना आज त्यांना देत आहे. किंबहुना यांच्या सुना जास्त त्रास देत आहेत कारण निसर्ग नियम. जे पेरावे ते व्यापक प्रमाणात उगवते.
आज वर्तमान समाजात वाढता हिंसाचार असो की कलह असो अथवा वाढता तणाव असो यामागे भूतकाळातील पेरणी आहे. कोणताही वर्तमान हा भूतकाळाची एक निष्पत्ती आहे तसेच कोणताही वर्तमान हा भविष्याचा पाया आहे त्यामुळे वर्तमानात आचरण करताना जागरूकता, दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा येरे माझ्या मागल्या होत इतिहासाची पुनरावृत्ती होणार यात शंका नाही.
पश्चाताप करण्यापेक्षा दक्षता उत्तम आहे. आज आदर द्या भविष्यात तुम्हाला आदर मिळेल.
Comments
Post a Comment