आभासीक ऐक्य
जगातील कोणत्याही देशातील, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही कारणास्तव एकत्र येणाऱ्या लोकांच्यात जे काही ऐक्य आढळते, त्यामध्ये आभास किती व वास्तव किती? प्रथम दर्शनी ऐक्य म्हणजे वास्तव भासते, पण तो आभास असल्याचे कालांतराने प्रत्ययास येते. अर्थात असा प्रत्यय प्रत्येकाला मिळेल असा नियम नाही.
कोणत्याही ठिकाणी माणूस सहज एकत्र येत नाही तर ठराविक उद्देशासाठी एकत्र येतात. भारतीय स्वातंत्र लढा सुरु असताना अनेक भारतीय एकत्र आले. यामध्ये अहिंसक मार्गाने वाटचाल करणारे तसेच हिंसक मार्गाने वाटचाल करणारे यांचा समावेश होता. या एकत्रीकरणात जात-पात, धर्म, प्रांत, भाषा यांना महत्व नव्हते किंबहुना स्थान नव्हते. मात्र ज्या प्रमाणात स्वातंत्र्य दृष्टीच्या टप्यात येण्यास प्रारंभ झाला त्या प्रमाणात एकीकरनास तडे जाण्यास प्रारंभ झाला. उद्दिष्ट प्राप्त होता होता धर्म आधार मानत फाळणी झाली. याच फाळणीची पुढील फाळणी प्रांत आधारित होत एकाचे तीन देश झाले. भारत व पाक मध्ये सध्या प्रांत व भाषा सोबत धर्म वाद यांचे प्रमाण वाढत असून वारंवार संघर्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोणत्याही प्रांत असो की धर्मात पुन्हा उपप्रांत व पंथ-उपपंथ आहेत. गंमत म्हणजे यांचा देखील आपसात संघर्ष सुरु आहे. एकाच उपपंथ मध्ये अनेक संघटन आहेत त्यांचा आपसात संघर्ष घडतो. एका राजकीय पक्षात ज्याप्रमाणे गट-तट त्याप्रमाणे पंथ व उपपंथ मध्ये गट-तट आहेत. या समस्त गटात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात संघर्ष घडत असतो. देश, प्रांत, धर्म, पंथ याबाह्य जगातील पातळी पेक्षा कौटुंबिक पातळीला पहा किती प्रमाणात ऐक्य आहे?
कोणताही माणूस सहज एकत्र येत नाही कारण मानवी स्वभावातील अहंकार. मानवाचा अहंकार ज्याघटका सोबत जोडला जातो तो घटक संकटात असल्याचे भासते त्यावेळी तो एकत्र येतो. मानवाला समूहाची गरज भासते यापेक्षा मानवी अहंकाराला समूहाची गरज भासते याविना त्याला त्याचे अस्तित्व दर्शवण्याची संधी मिळत नाही. मानवी अहंकार हा ऐक्याचा आभास निर्माण करतो मात्र त्याचवेळी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दर्शवण्याचा प्रयत्न देखील करतो. यामुळे ऐक्याला सुरुंग लागतो.
भारतीय स्वातंत्र लढा सुरु असताना समस्त भारतीय एकत्र आले का? ज्यांना भारत ‘माझा देश’ वाटला ते एकत्र आले, यामध्ये देश पेक्षा ‘माझा’ महत्वाचा आहे. प्रांत पेक्षा माझा प्रांत, धर्म पेक्षा माझा धर्म, पंथ पेक्षा माझा पंथ तसेच भाषा पेक्षा माझी भाषा अधिक महत्वाची आहे. एक साधा सोपा प्रयोग करून पहा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळेल. ‘मेरा भारत महान’ एकदा मोठ्याने बोला रोमांच जाणवेल तेच ‘भारत महान’ बोलतच रोमांच जाणवतो का?
मानवी अहंकार स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी कोणत्याही घटका समवेत जोडला जातो. अहंकार ज्या घटकासोबत जोडला त्या घटकाचे रक्षण करण्यास माणूस सरसावतो. मानवी अहंकार हा अनेक आभास निर्माण करतो व मानवी समूहाचे ऐक्य त्या आभासाचे एक प्रतिक आहे. अहंकाराचे ऐक्य त्याठिकाणी घृणा, द्वेष, तिरस्कार, विटंबना, मत्सर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात आढळतात.
भारतीय समाजात कधी काळी इंग्रजा संदर्भात तिरस्कार, घृणा होती ती आता विशिष्ठ जात, धर्म, प्रांत, भाषा यासंदर्भात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मानव प्रेम भावनेतून सहज एकत्र येत नाही परंतु द्वेष, घृणा, तिरस्कार मानवाला सहज एकत्र करतात मात्र या ऐक्यात देखील द्वेष, घृणा असते. कधी काळी भारतीय राजकारणात जनता दल नावाचा एक राजकीय पक्ष उदयाला आला त्यामागे एका व्यक्तीला, पक्षाला विरोध करण्यासाठी समस्त विरोधक एकत्र आले पण ज्या गतीने एक झाले त्याच गतीने विभक्त झाले.
आज समस्त भारतीय एक होतात पण त्यासाठी दहशदवादी हल्ला किंवा पाक-चीन असा विषय लागतो व त्यामागे द्वेष, घृणा, तिरस्कार, सूडबुद्धी गरजेची असते अन्यथा सहज भारतीय एकता निर्माण होते का? सामान्यतः आम्ही जगताना एक भारतीय किंवा एक माणूस म्हणून जगतो का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. आम्ही आमच्या अहंकाराचे गुलाम होत गुलामी करतो वर याला स्वाभिमान व अस्मिता सारखे गोंडस नाव देतो. कोणत्याही स्वाभिमानाला व अस्मितेला समूहाची गरज नसते.
व्यक्तिगत अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करून पहा ऐक्या मागील आभास व वास्तव यांचा प्रत्यय मिळेल.
Comments
Post a Comment