महावीर की महाविनाश
नेपोलियन बोनापार्ट असो की जगजेत्ता सिकंदर
असो अथवा जागतिक इतिहासातील कोणताही पराक्रमी राजा असो त्यांना ‘महावीर’ ही
पदवी-उपाधी मिळाली का? अर्थात त्यांना तत्कालीन काळात महावीर समजण्यात आले मात्र
काळाच्या ओघात महावीरपणा नामशेष झाला. मात्र इतिहासातील दोन महावीर अजरामर झाले.
एक रामभक्त हनुमान तर दुसरे जैन तीर्थंकर भगवान महावीर. एक भक्ती परंपरेचे प्रतिक
तर दुसरे श्रमण परंपरेचे प्रतिक आहेत.
दोन्ही महावीरांचा मार्ग भिन्न आहे पण
निष्पत्ती एक आहे. ती निष्पत्ती म्हणजे संयम. साधारणतः स्वतःवर नियंत्रण म्हणजे
संयम समजण्यात येते मात्र संयम म्हणजे सत्याचा आयाम, सत्य पाहण्याची तसेच आकलन
करण्याची क्षमता. अर्थात ही क्षमता बाजारात विकत मिळत नाही तर त्यासाठी आत्मसाधना
करावी लागते. अहंकाराच्या विवेक या स्वरूपाला सक्रीय करावे
लागते म्हणजे थोडक्यात जग काय करते यापेक्षा आपण काय पाहतो, कसे पाहतो व कसे-काय
आकलन करतो याला महत्व आहे. दुसऱ्या शब्दात व्यक्तिगत दृष्टी मर्यादा संदर्भात
जागरूक राहणे.अर्थात हे इतके सुलभ नाही कारण अहंकार स्वतःला वाचवण्यासाठी संभ्रम
निर्माण करतो.
नियंत्रणाला संयम समजणे, अहंकाराला स्वाभिमान
व अस्मिता समजणे हा संभ्रमाचा भाग आहे. वर्तमान समाजाला संयमाची नितांत गरज आहे हे
सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषा किंवा तज्ञाची गरज नाही. वर्तमान मानवी जीवन पहा या
मध्ये बेफाम, बेभान, बेलगाम पणा व्यापक प्रमाणात आहे. अर्थात हा काही एक दोन दिवस
अथवा वर्षामधील नाही तर त्यामागे एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा आरंभ
मानवी उत्पत्ती पासून आहे. काळाच्या ओघात यामध्ये परिवर्तन होत आहे. कोणत्याही
प्रकारचे परिवर्तन समजण्यासाठी सापेक्षतेचा आधार घ्यावा लागतो.
मानवाने उत्क्रांती केली त्याप्रमाणात त्याचा
विवेक सक्रीय झाला नंतर अहंकार सक्रीय झाला यामुळे त्याने प्रथम धर्मात व नंतर
विज्ञानात गती घेतली. परिवर्तन या निसर्ग नियामामागे परिवलन आहे यामुळे निसर्गात
अस्थिरता आहे. धर्माचे शिखर सर करताच अहंकाराचा प्रवास सुरु झाला. अहंकाराचा
प्रवास हा विनाशाचा प्रवास आहे कारण अहंकार असंयम घडवतो. वर्तमान समाजात संयम की
असंयम याची खातरजमा करण्यासाठी स्वतःचे आचरण पहावे.
मानवाची उत्पत्ती सोबत विनाशाचा प्रवास सुरु
झाला कारण जन्म हा वास्तवात मृत्यूचा प्रवास आहे. जन्माविना मृत्यू नाही. मृत्यूचा
प्रवास अप्रत्यक्ष स्वरुपात असतो. आपण हा प्रवास टाळू शकत नाही मात्र लांबवता येणे
शक्य आहे. मात्र त्यासाठी संयम गरजेचा आहे. संयमा विना गती नियंत्रण करता येत नाही
तसेच जे बेफाम, बेलगाम, बेभानपणा आहे तो नियंत्रीत होणार नाही. थोडक्यात कायदा वा
शस्त्र याने स्वैराचार नियंत्रण होत नाही. संयमा विना अतिरेक थांबणार नाही. मात्र
संयामासाठी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावे लागते तसेच हे करण्याचे कोणतेही साधन
बाजारात मिळत नाही.
आज मानवाला स्वतः पेक्षा बाजारात अधिक स्वारस्य आहे यामुळे त्याने
जीवनाचा बाजार मांडला आहे. जीवनाशी निगडीत प्रत्येक क्षेत्राला बाजारूपणा आला आहे.
याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे व त्याची सुरुवात स्वतः पासून करावी लागेल तरच
महावीर होणार आहे. या महावीरत्वासाठी जगला नाही तर स्वतःला जिंकायचे आहे अन्यथा
विनाश तो देखील लवकर होणार आहे कारण वेग. आवरा वेगला, सावरा जीवनाला हे सार्वजनिक
बांधकाम खात्याचे वाक्य निखळ रोड प्रवासासाठी नसून जीवन प्रवासासाठी आहे. ज्याने
अंगिकारले तो महावीर होणार अन्यथा विनाश. निर्णय आम्हाला घायचा आहे.
Comments
Post a Comment