देशप्रेमी की द्रोही?


निवडणुकांच्या तोंडावर नेता असो की सामान्य माणूस यांना अफजल गुरु व अजमल कसाब यांची हमखास आठवण होते किंवा करून देण्यात येते. या दोघांना न्यायालयाने देशद्रोही कारवाई करण्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांचा देशद्रोह सगळ्यांना समजतो तसेच माहित आहे मात्र अनेक सामान्य व्यक्ती व राजकीय नेते यांचा देशद्रोह दुर्लक्षित होतो किंवा या संदर्भात ज्ञान नाही.
देशाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात कोणत्याही कारणास्तव नुकसान-हानी करणे म्हणजे देशद्रोह आहे. अर्थात नुकसान करणारा व्यक्ती कोणत्याही देशाचा नागरीक असो अथवा कोणत्याही धर्म वा पंथाचा असो त्याने देशाचे नुकसान करताच तो देशद्रोही आहे.
आपल्या देशात अनेक जात-पात, धर्म, संस्कृती, भाषा, प्रांत रक्षक आहेत. या व्यक्ती अस्मिता व स्वाभिमानाचा प्रश्न या नावाखाली राजरोस धुमाकूळ घालत खाजगी तसेच सार्वजनिक, शासकीय मालमत्तेचे मनसोक्त नुकसान करतात. भावना भडकल्या, एक प्रतिक्रिया होती, जश्याला तसे उत्तर दिले, या प्रकारचे वक्तव्य करीत कृतीचे समर्थन करण्यात येते. या वर्गवारीत मोडणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात देशाचे नुकसान करतात. अर्थात हे नुकसान निखळ वर्तमान कालीन नसून त्याचे पडसाद भविष्यात देखील मिळतात. वर्तमान कृती म्हणजे पेरणी आहे भविष्यात त्याची फळे मिळणार ती देखील व्यापक प्रमाणात. गव्हाचा एक दाना पेरता तो भविष्यात अनेक दाणे देतो. वर्तमान सामजिक हिंसाचार मागे भूतकाळातील हिंसाचार आहे व त्याचे पडसाद आज आम्हाला भोगावे लागत आहेत.
अस्मिता-स्वाभिमान तसेच रक्षण या गोंडस नावाखाली स्वतःचा अहंकार व अज्ञान झाकण्यात येते तसेच या नावाने माणूस झीन्गतो. वास्तव न पाहता, न विचार करता संकुचित बुद्धीने पेटून उठतो तसेच कृती करतो यामुळे त्याला कृती करताना भान राहत नाही. आपली कृती सामाजिक जीवन तसेच ऐक्याला हानिकारक, मारक असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात देशाच्या ऐक्याला व स्थिरतेला घातक आहे याचे मानवाला भान राहत नाही. सामाजिक हिंसाचार हा देशाला अस्थिर करतो, अशांतता निर्माण करतो तसेच होणारे आर्थिक नुकसान देशहिताचे लक्षण की देशद्रोहाचे लक्षण?
सार्वजनिक मालमत्ता म्हणजे ‘मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन’ अशी मानसिकता असणारा नेता, अधिकारी व सामान्य माणूस कळत-नकळत तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात देशाचे नुकसान करतात हे देशप्रेमाचे लक्षण की देशद्रोहाचे लक्षण? शासकीय मालमत्तेचा गैरवापर करणारा देशप्रेमी समजावा का?
शासन आर्थिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करते त्याविना राज्यकारभार करता येत नाही. आपल्या देशात विविध प्रकारचा कर भरणा करताना प्रामाणिकपणा किती? तसेच अप्रामाणिकपणा किती? देशाकडून घेताना अधिकार आहे मात्र देताना माझ्या कष्टाचा पैसा का देऊ? मी बचत केली तर नुकसान काय? सगळे करतात तेच मी करतो, याप्रकारचे युक्तिवाद करण्यात येतात. सोयीस्कररित्या व्यक्तिगत राष्ट्रीय कर्तव्याला बगल दिली जाते हा देशप्रेमाचा नमुना की देशद्रोहाचा?
भ्रष्टाचार म्हणजे स्वार्थ साधण्याची एक निष्पत्ती आहे. लाच घेणारा तसेच देणारा दोन्ही गुन्हेगार आहेत. थोडक्यात व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी इतरांचे नुकसान करणारी मानसिकता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात देशद्रोह आहे.
आज गुरु असो की कसाब हे परकीय आहेत तसेच उघड शत्रू आहेत मात्र त्यांच्या पेक्षा मोठे द्रोही हे स्वकीय आहेत. भारतीय इतिहास चाळून पहा परकीय आक्रमण असो की परकीयांची सत्ता स्थावर होणे असो त्यांना काही भारतीयांची मदत होती. अर्थात एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना आपल्या कडे तीन बोट असतात गरज आहे ती बोटे पाहण्याची. दुसरा काय करतो किंवा त्याने काय केले यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचे आहे. जो स्वार्थाचा विचार करतो किंवा करणार तो देशद्रोह करणार. दुर्दैवाने त्यावर ना खटला भरला जाणार ना शिक्षा होणार पण जनाचा नाही तर मनाचा विचार कारण पाहावा ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

पेरावे तसे उगवते

अंथरूण पाहून पाय पसरणे