धर्म व विज्ञान
मानवी समाजात धर्म व
विज्ञान यांना भिन्न समजण्यात येते तसेच या दोन्हीत तुलना करण्यात येते. मानव धर्म
व विज्ञान यांच्यात तुलना करताना ज्याला धर्म व विज्ञान समजतो त्या नुसार तुलना
करतो. मानव वास्तवात धर्म व विज्ञान यात तुलना करतो असा नियम नाही. वास्तवात
निसर्गातील कोणत्याही दोन घटकात तुलना करता येत नाही मात्र मानव आकलन व अभिव्यक्ती
सुलभ करण्यासाठी तत्सम प्रकार करतो.
थोडक्यात मानव
व्यक्तिगत दृष्टीकोन, आकलन यांच्या क्षमता नुसार तुलनात्मक अभ्यास करतो मात्र ना
दृष्टीकोन परिपूर्ण ना आकलन परिपूर्ण. अर्थात याठिकाणी तुलना करण्याचे निकष
स्वतःच्या आकलन क्षमता नुसार ठरवण्यात येतात तसेच या निकषावर त्या व्यक्तीच्या
स्वभाव सापेक्षतेचा प्रभाव असतो. सापेक्षता विना तुलनात्मक अभ्यास करता येत नाही.
धर्म व विज्ञान
यांचा तुलनात्मक अभ्यास करताना सर्वात प्रथम या दोन्हीच्या दृष्टीचा अभ्यास करावा
लागतो कारण दृष्टी नुसार आकलन बदलते. धर्म दृष्टी व्यक्तिगत अंतरंगाकडे प्रवास
करते तेच विज्ञान दृष्टी इतरांच्या अंतरंगाकडे प्रवास करते. दुसऱ्या शब्दात धर्म
म्हणजे स्वतःच्या स्वभाव-गुणधर्मांचा मागोवा-अभ्यास आहे. तेच विज्ञान म्हणजे
इतरांच्या स्वभाव-गुणधर्मांचा मागोवा-अभ्यास आहे.
धर्म व विज्ञान
वास्तवात परस्पर विरुद्ध दिशेने पाहतात कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
विरुद्धता त्याठिकाणी परस्पर पूरकता तसेच सापेक्षता आहे. स्वतःचे विज्ञान म्हणजे
धर्म तसेच इतरांचा धर्म म्हणजे विज्ञान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र
मानव एका सापेक्ष दुसऱ्याचे परीक्षण करतो यामुळे एकांगी पाहतो तसेच एकांगी आकलन
करीत वाटचाल करतो. तसेच मानव धर्माचा विज्ञानाच्या दृष्टीने किंवा विज्ञानाचा
धर्माच्या दृष्टीने अभ्यास करतो वास्तवात स्वतःच्या दृष्टीने पाहतो पण त्याला
धर्माचा किंवा विज्ञानाचा दृष्टीकोन समजतो यामुळे गल्लत घडते.
धर्म म्हणजे
व्यक्तिगत दृष्टी ते सृष्टी असा प्रवास आहे तेच विज्ञानात सृष्टी ते दृष्टी असा
प्रवास आहे. धर्मात दृष्टी प्राथमिक असून सृष्टी दुय्यम किंवा ग्राह्य आहे तेच
विज्ञानात सृष्टी प्राथमिक असून दृष्टी दुय्यम किंवा ग्राह्य आहे. थोडक्यात धर्मात
दृष्टीचा मागोवा तेच विज्ञानात सृष्टीचा मागोवा आहे. अर्थात पाहणाऱ्या दृष्टी व
आकलन प्रमाणे समस्त संदर्भ व आकलन यामध्ये परिवर्तन घडणार आहे.
धर्म असो की विज्ञान या
दोन्ही मध्ये ज्या प्रमाणे भिन्नता आहे त्याच प्रमाणे एकता आहे. धर्म व विज्ञान या
दोन्ही मानवाच्या निर्मिती आहेत. या दोन्ही मध्ये ज्ञान-शास्त्र आहे. तसेच या
दोघांना मर्यादा आहेत कारण मुळात मानवाला मर्यादा आहेत. ना मानव परिपूर्ण ना
मानवाचे आकलन परिपूर्ण यामुळे ना धर्माचे ना विज्ञानाचे आकलन परिपूर्ण. स्वतःच्या
मर्यादा सांगतो तो धर्म तेच दुसऱ्यांच्या मर्यादा सांगतो ते विज्ञान पण जो स्वतः
अपरिपूर्ण तो इतरांच्या मर्यादा ठरवण्यास सक्षम किंवा पात्र आहे का? या प्रश्नाचे
उत्तर स्वतःच्या अंतरंगात उतरून शोधण्याचा प्रयन्त करून पाहावा ही विनंती.
Comments
Post a Comment