स्त्रियांचा दुजाभाव
एक स्त्री दुसऱ्या
स्त्री सोबत दुजाभाव करते याचा मला नुकताच प्रत्यय आला. एका मित्राच्या लहान
भावासाठी वधू संशोधन करताना मिळालेला एक अनुभव आहे. भावी वधू संदर्भात मुलाच्या
तसेच मुलाच्या आईच्या अपेक्षा पाहता स्त्रीचा दुजाभाव समजला.
वर मुलाची वधू कडून
अपेक्षा म्हणजे घराला घरपण देणारी मुलगी असावी. तेच मुलाच्या आईची अपेक्षा म्हणजे
घरकाम तसेच करिअर करून संसाराला हातभार लावणारी मुलगी असावी, मी कोणत्याही
प्रकारचे घरकाम करणार नाही किंवा पाहणार नाही. करिअर मध्ये सुद्धा महिना २० ते २५
हजार रुपये महिना कमावणारी पाहिजे.
गंमत म्हणजे याच
विवाह योग्य मुलाची एक बहिण देखील विवाह योग्य आहे. संभाव्य जावई कोणत्या प्रकारचा
असावा अशी विचारणा करता, एकुलता एक मुलगा असावा तो देखील विभक्त राहणारा असावा,
माझी मुलगी घरकाम करणार नाही तर फक्त करिअर करणार आहे याला त्याने हरकत घेता काम
नये. थोडक्यात येणाऱ्या सुने साठी तसेच मुलीसाठी वेगळ्या अपेक्षा-निकष आहेत.
याठिकाणी सरळ-सरळ भेदभाव ते दुजाभाव आहे. सून असो की जावई ते माझ्या
हिशोबाने-सोयीने वागणारे हवेत.
अर्थात असा प्रकार
एकाच घरात किंवा प्रथमच घडत आहे असे नाही तर जवळपास प्रत्येक घरात असा प्रकार घडत
होता तसेच आहे व कदाचित भविष्यात देखील घडणार आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला
समजावून घेण्यात कमी पडते की दुजाभाव मुळे समजावून घेण्यास तयार नसते हे कळण्यास
मार्ग नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत मात्र हे अपवादांचे प्रमाण अगदी नगण्य
आहे.
सुनांना सासुरवास
असो किंवा काळाच्या ओघात निर्माण होत असलेला सासवांना सुनवास असो म्हणजे सुनेला
अथवा सासूला जाच करणारी एक स्त्रीच आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला त्रास देते
कारण आपलेपणाचा अभाव. सून असो की सासू परकी समजण्यात येते. सुनेला मुलीचा तसेच
सासूला आईचे स्थान मिळत नाही. अर्थात याठिकाणी दोन पक्ष आहेत तसेच दोन्ही पक्षाची
जडण-घडण, संस्कार तसेच संस्कृती यामध्ये भिन्नता आहे मात्र ठरवले तर एकता निर्माण
करता येते परंतु हा प्रकार घडत नाही.
एक स्त्रीच
स्वतःच्या मुलीला शिकवण देते की सासूला त्रास कसा द्यावा, पाराचा कावळा कसा करावा,
स्वतःच्या पतीला मुठीत कसे ठेवावे पण त्यावेळी तिला विस्मरण होते की आपण देखील
सासू होणार आहोत तसेच आपल्या घरात देखील एक मुलगी नांदण्यास येणार आहे. आपल्या
मुलीने सासू सासऱ्यांचा सांभाळ करू नये तर आपल्या सुनेने सांभाळ करावा ही अपेक्षा
बाळगावी का?
माझ्या जावयाने
माझ्या मुलीच्या तंत्राने वागता तो चांगला जावई आहे तेच माझ्या मुलाने त्याच्या
बायकोच्या तंत्राने वागता नालायक मुलगा आहे. आपल्या घरातील एक मुलगी दुसऱ्या घरात
नांदायला जाते त्याप्रमाणे दुसऱ्या घरातील एक मुलगी आपल्या घरात नांदायला येते तर
या दोघीत दुजाभाव का? माझ्या मुलीला एक न्याय तर तुझ्या मुलीला दुसरा न्याय का?
माझ्या मुलीवर होतो तो अत्याचार तेच दुसऱ्यांच्या मुलीवर होतो तेव्हा काय?
जो पर्यंत एक स्त्री
दुसऱ्या स्त्रीला समजावून घेत नाही तो पर्यंत कौटुंबिक हिंसाचार असो की सामाजिक
हिंसाचार नाहीसा होणार नाही कारण भावी पिढीवर होणारा संस्कार. उगाच कौटुंबिक
जीवनाला संसार म्हणत नाहीत. एक कुटुंब म्हणजे एक संसार तसेच एक समाज आहे यामुळे
ब्रम्हांड रूपी संसार असो की सामाजिक जीवन यामध्ये जो दुजाभाव आहे त्याचा प्रारंभ
तसेच संस्कार कौटुंबिक जीवनात आहे. घडवणे असो की बिघडवणे हे सर्वस्वी
स्त्रियांच्या हातात आहे. थोडे चिंतन करून पहा.
Comments
Post a Comment