आणि मी मेलो तर.........
शाळेत असताना निबंध
लिखाण करण्यासाठी मी .....झालो तर असा एक विषय असतो. जीवनाच्या मुक्त विद्यापीठात
लिखाण करताना विचार केला की मी मेलो तर. जन्मा सोबत मृत्यूचा प्रवास सुरु झाला तो
उद्या अंतिम ठिकाणाला पोहचणार आहे. अर्थात तो मृत्यू क्षण भविष्यात असणार या बद्दल
शंका नाही.
माझा मृत्यू
झाल्यानंतर जे सगळ्यांच्या बाबतीत होते तेच होणार आहे. यामध्ये नवीन किंवा वेगळे
काहीच नाही. कोणाला दुखः होणार तर कोणाला आनंद होणार. कोणी हळहळ व्यक्त करणार तर
कोणी म्हणेल बरे झाले. कोणी म्हणेल एक चांगला माणूस गेला तर कोणी म्हणेल एक वाईट
माणूस गेला. कोणाच्या दृष्टीने एक लायक गेला तेच कोणाच्या दृष्टीने नालायक गेला.
थोडक्यात जितक्या दृष्टी त्यानुसार त्यांची प्रतिक्रिया असणार. माझ्या संदर्भात
कोणत्याही व्यक्तीचे मत त्याप्रमाणे त्याची अभिव्यक्ती असणार.
मला स्मशानात
पोहचवल्या नंतर कदाचित श्रद्धांजली देण्यात येणार त्यामध्ये प्रसंगी माझ्यात
असलेला व नसलेला चांगुलपणा सांगण्यात येणार नंतर जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाने
निघून जाणार. काही व्यक्तींच्या दृष्टीने एक अस्तित्व संपले पण वास्तवात कोणते
अस्तित्व संपले? शरीर हे अस्तित्व आहे का? जर असेल तर ते पंच महाभूत तत्वांनी बनले
आहे त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. याठिकाणी फक्त स्वरूप परिवर्तन होणार आहे.
शरीराचे राखेत रुपांतरण होणार आहे.
वैद्यकीय भाषेत
पाहता शरीर हे लाखो पेशींनी बनले असून प्रत्येक क्षणात काही नवीन पेशी निर्माण होतात
तसेच नष्ट होतात मृत्यू नंतर पेशी निर्माण होणार नाहीत मात्र नष्ट होणार आहेत.
निसर्ग चक्र पहा त्यामध्ये काही नष्ट झाल्याविना काही निर्माण होत नाही. एक मृत्यू
म्हणजे स्वरूप परिवर्तन म्हणा अथवा नाश म्हणा त्याविना नवीन निर्मिती नाही. प्रत्येक
निर्मिती मागे एक ऱ्हास आहे तसेच ऱ्हासा मधून निर्मिती आहेत. निर्मिती व ऱ्हास,
जन्म व मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
निसर्गात जीवन चक्र
आहे. काही व्यक्ती जीवन म्हणजे एका दिशेने प्रवास मानतात मात्र निसर्ग व चक्र
अविभाज्य आहेत. मानवाला जन्म ते मृत्यू हा प्रवास माहित-ज्ञात आहे मात्र मृत्यू ते
जन्म हा प्रवास अज्ञात आहे. जे काही अज्ञात त्याठिकाणी शक्यता दुहेरी आहे, एकतर
असेल किंवा नसेल. असेल तसेच नसेल यापैकी कोणत्याही प्रकारचा एकांगी दावा करता येतो
यामध्ये शंका नाही.
वर्तमान मानवी
प्रज्ञा मर्यादा लक्षात घेता एकतर मृत्यू ते जन्म असा प्रवास नाही ही एक शक्यता
आहे त्याचप्रमाणे मृत्यू ते जन्म हा प्रवास शोधण्या इतकी मानवी प्रज्ञा विकसित
झाली नाही अशी दुसरी शक्यता आहे. धर्म ज्ञान सापेक्ष विचार करता मृत्यू ते जन्म
असा प्रवास आहे. अर्थात इथे हा त्यांचा व्यक्तिगत अनुभव की संकल्पना हे समजण्यास
मार्ग नाही. तेच विज्ञान सापेक्ष विचार करता आज पर्यंत विज्ञान असा प्रवास
शोधण्यात यशस्वी झाले नाही. याचा काही व्यक्ती अन्वयार्थ लावत असा प्रवास नाहीच
याबद्दल अट्टाहास करतात कारण अज्ञान.
जन्म ते मृत्यू या
प्रवासात प्रवास करताना आपली मान्यता कोणती हे महत्वाचे आहे. मृत्यू म्हणजे
समात्पी असो की नवनिर्मिती असो निसर्गात वास्तव काय आहे यापेक्षा आपण काय मानतो
त्याच अनुषंगाने आचरण घडते. माझ्या दृष्टीने जन्म व मृत्यू म्हणजे फक्त स्वरूप
परिवर्तन आहे. मृत्यू नंतर देखील माणूस समाजात अस्तीत्वा मध्ये असतो ते स्वरूप
म्हणजे स्मृती तसेच विचार-संस्कार. यासंदर्भात आपण कधी विचार केला का?
सामान्यतः माणूस
विचार करताना माझ्या मृत्यू नंतर माझ्या कुटुंबाचे काय होणार असा विचार करून धावपळ
करीत तजवीज करण्याचा प्रयन्त करतो मात्र स्वतःचे विचार तसेच संस्कार
मुलांना-समाजाला प्रदान करीत आहोत याचे विस्मरण होते तसेच दक्षता घेतली जात नाही
कारण अनुकरण व संस्कार. थोडा विचार करून पहा आपण जे पहिले त्याचे अनुकरण करीत आहोत
मात्र कळत नकळत पुनरावृत्ती करीत आहोत.
आपण भावी पिढी साठी
कितीही संपत्ती गोळा करून ठेवली तरीही कमी आहे तसेच जास्त आहे कारण कमी व जास्त एकाच नाण्याच्या दोन बाजू
आहेत. असो आपण जे काही करतो त्याने आपल्या सहवासात येणारी माणसे प्रभावित ते
संस्कारीत होतात यामुळे आचरण करताना दक्षता हवी.
अखेर आपण आपल्या
मागे काय ठेवणार आहोत यामध्ये मृत्यू म्हणजे काय याची निर्णायक भूमिका आहे.
थोडक्यात विचार करून पहा की मी मेलो तर अर्थात हा विचार अनेक दृष्टींनी करून
पाहावा म्हणजे वास्तवाचा काही प्रमाणात प्रत्यय मिळेल.
Comments
Post a Comment